नाशिक : शहरातील जुने सिडको परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गुंडांनी एका भाजी विक्रेत्याची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेला काही तास उलटत नाही तोच त्याच परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा काही टवाळखोरांनी हैदोस घालत अनेक वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या परिसरात सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
१२ ते १५ गाड्यांची तोडफोड : याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक साईबाबा मंदिर मागील बाजू येथे अज्ञात टवाळखोरांनी 12 ते 15 वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून टोळक्यानी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.
पोलिसांचा धाक उरला नाही : सिडको परिसरात गेल्या काही महिन्यांपासून खून, हाणामाऱ्या, चोऱ्या अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अशात पोलिसांचा धाकच उरलेला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. पोलिसांनी या भागात ग्रस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
भाजी विक्रेत्याची हत्या : दोन दिवसांपूर्वी सिडको भागातील लेखानगर येथील शॉपिंग सेंटर येथे भाजी विक्रेता संदीप आठवले (22 वर्षे) याची हत्या करण्यात आली. चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी संदीपची हत्या केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीपचा जागीच मृत्यू झाला. संदीपवर हल्ला करुन हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली आहे.
पुण्यातही अशीच घटना : पुण्यात दहशत माजवण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी मार्च, 2022 मध्ये अशाच प्रकारे वाहनांची तोडफोड केली होती. यामध्ये सात दुचाकी, रिक्षा आणि एका कारचं नुकसान झालं होतं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत होती. शहरातील येरवडा भागात काही गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली. पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली होती. वाहनांची तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तिंविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली होती. पोलीस गुन्हेगार तरुणांचा शोध घेत होते.
हेही वाचा: