नाशिक - कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. दिंडोरी शहरात भाजीपाला, फळ बाजारात विशिष्ट अंतर राखून विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. ग्राहकांची संख्या मर्यादित असल्याने विक्रीस आणलेला माल शेतकऱ्यांना पुन्हा घरी घेऊन जावा लागत आहे. दिंडोरीत भाजीपाला बाजार रोज सकाळी 8 ते 2 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील, नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ व सर्व नगरसेवक यांची संयुक्त बैठक झाली.
भाजीपाला बाजाराचे नियोजन करण्यात आले. बाजार पटांगण परिसरात शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी स्वतंत्र जागा नियोजन करत सर्व व्यावसायिकांना सुरक्षित अंतर आखून देण्यात आले आहे. सदर बाजारात वाहनांना बंदी घालत प्रवेशद्वारावरून एकाच व्यक्तीस बाजारात सोडण्यात आले. मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधला असेल तरच बाजारात प्रवेश देण्यात येत आहे. शिस्तबद्ध पद्धतीने बाजार सुरू असून ठिकठिकाणी नगरपंचायत कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत
नगरपंचायत कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप -
दिंडोरी नगरपंचायततर्फे सर्व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. डॉ. शितलकुमार पहाडे यांनी ग्लोव्ह्ज तर परणोल्ड रिकार्ड कंपनीने सॅनिटायझर दिले. यावेळी मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील यांनी कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याबाबत विविध सूचना करत संकटकाळी सर्व कर्मचारी परिश्रम घेत असल्याबाबत आभार मानले. खासगी दवाखाने सुरू ठेवावे. दिंडोरी येथील एक बाल रुग्णालयाने आपले हॉस्पिटल बंद असल्याबाबत फलक लावला तर काही डॉक्टर ओपीडी बंद ठेवत फोनवर सल्ला देत आहेत. याबाबत नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असून याबाबत प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी सर्व डॉक्टर यांना आपले दवाखाने सुरू ठेवावे, उपचार सुरू ठेवावे कुणी संदिग्ध रुग्ण आढळल्यास तत्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालयात कळवावे असे आवाहन केले आहे. रुग्णालय बंद ठेवणाऱ्यांवर शासन आदेशान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
प्रशासन सज्ज -
दिंडोरी पेठ तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करून लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी सर्व किराणा दुकान व भाजीबाजार शिस्त व काळजी घेत व्यवस्थित सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी दुकाने तसेच त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर पाठवायचा आहे. त्यांनी प्रांत कार्यालयात सर्व अधिकृत कागदपत्रे सादर करून परवाने देण्यात येत आहेत. मात्र, त्याचा कुणी गैरवापर करू नये. अनावश्यक घराबाहेर पडू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल.
गावोगाव सेवाभावी संस्था, समाजसेवी युवक यांच्या समित्या स्थापन करून विविध उपाययोजना व मदत पोहचविण्यासाठी मदत घेण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी सरकारच्या निर्देशांचे पालन करावे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी कुटुंबातील एकाच सदस्याने यावे. वाहनांचा वापर करू नये. रस्त्यात चौकात जमा होऊ नये. गर्दी करू नये अन्यथा पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल. शेतमाल व अत्यावश्यक सेवा वापरणाऱ्या वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांची नोंदणी करून त्याचे पासेस घ्यावे त्या वाहनांचा गैरवापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.