नाशिक : शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी टोळक्याच्या मारहाणीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाही तोच नाशिकमधील सिडको परिसरात 4 ते 5 अज्ञातांनी एका भाजी विक्रेत्यांची भरदिवसा हत्या केल्याची घटना गुरुवारी घडलीय. भाजी विक्रेत्यावर धारधार शस्त्रानं हल्ला झाल्यानं नाशिक शहर पुन्हा हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी चार तासात तीन संशयितांना ताब्यात घेतलंय.
युवकाची हत्या : मिळालेल्या माहितीनुसार, सिडको भागात असलेल्या लेखानगरमधील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे ही घटना घडलीय. संदीप आठवले (22 वर्षे) खून झालेल्या भाजी विक्रेत्याचं नाव आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्यानं संदीपवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. संदीपच्या छातीत, पोटात, मानेवर तब्बल 30 पेक्षा अधिकवेळा वार करण्यात आले. संदीपवर हल्ला करुन हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान या हल्ल्यात संदीपचा जागीच मृत्यू झाला. संदीपची हत्या का करण्यात आली याचे कारण अजून समजलेले नाही. नाशिक पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवलाय.
संशयितांना अटक: संदीपवर हल्ला करण्यात आल्याची घटना एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झालीय. पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारेच आरोपींचा शोध घेत 3 संशयितांना अटक केलीय. हल्ला करणारे संशयित हे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. संदीपचा खून झाला तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. मात्र तेथे कोणीच नसते, असं नागरिकांनी सांगितलं. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी,अशी मागणीही नागरिकांनी केलीय.
एका महिन्यात चौथा खून : नाशिकच्या अंबड, सिडको या परिसरात हत्या सत्र सुरुय. गेल्या महिन्याभरात चार हत्येच्या घटना घडल्या आहेत. अंबड परिसरात किरकोळ कारणातून मिराज खान आणि इब्राहिम शेख यांची हत्या झाली होती. त्यानंतर दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने अंबडमध्ये एका युवकाची हत्या झाली होती. त्यानंतर आता संदीप आठवलेची हत्या झाली.
हेही वाचा-