नाशिक - पोलिसांच्या सायबर टीमने दिल्ली येथून वशीकरण बाबाला जेरबंद केलं आहे. या बाबाने देश विदेशातील 43 महिलांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले. नाशिकच्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर भोंदू बाबाचे पितळ उघडे पडले आहे.
वैयक्तिक जीवनात येणाऱ्या अडचणी वाशिकरणाच्या माध्यमातून सोडावण्यासाठी भोंदू बाबाच्या नादी लागणे देशासह विदेशातील माहिलांना चांगलेच महागात पडले आहे. वशीकरण करण्यासाठी 23 वर्षीय नीरज भार्गव ह्या भोंदू बाबानेच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांशी संपर्क करत वशिकरणाच्या पूजेसाठी त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला.
खाजगी जीवनात अडचणी असल्यामुळे नाशिकमधील एका महिलेने वशीकरण करण्यासाठी गुगलवर शोध घेतला होता. याच वेळी या महिलेला नीरज भार्गव याचा पत्ता मिळाला. वशीकरण करण्यासाठी या बाबाने महिलेकडून लाखो रुपये उकळले. मात्र, नंतर तिने आणखी पैसे जमा करण्यास असमर्थता दर्शवल्याने बाबाने महिला व प्रियकराच्या आई-वडिलांवर वशीकरण करून त्यांच्या जीवाला धोका पोहचवू, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचं समजताच महिलेनं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी ह्या घटनेची गंभीर दखल घेतली. यानंतर एका पोलीस कर्मचारी महिलेला वशीकरण करण्यासाठी बाबांशी संपर्क करण्यास सांगितले गेले. बाबांनी त्यांना दिल्ली येथे पैसे घेऊन बोलवले असता पोलिसांनी भोंदू बाबाला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल दोन डेबिट कार्ड जप्त करण्यात आलेत. अटक आरोपी नीरज अशोक कुमार भार्गव हा महिलांना पूजेच्या नावाने त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो मागत असे. पंडित रुधर शर्मा, खान अजमेर बाबा आणि राधे माँ या नावाने त्याचे अकाउंट सुरू होते. वशीकरण करण्यासाठी एकूण पाच वेबसाईट तो वापरत होता, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
फसवणूक झालेल्या महिलांमध्ये भारतासह कॅनडा, न्यूझीलंड येथील सुशिक्षित महिलांचादेखील समावेश आहे..पोलीस निरीक्षक देवराज बोरसे उपनिरीक्षक,रवींद्र देसले, संतोष काळे,राहुल जगताप मंगेश्वर काकुळदे, भूषण देशमुख, मल जोशी यांच्या टीमने ही कारवाई केली.