नाशिक - येथील दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे समोरून येणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. गणेश रमेश झिरवाळ व अंबादास महाले अशी मृत तरुणांची नावे आहेत. वडबारी येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - डिझेल प्रति लिटर १७ ते १८ पैशाने महाग; पेट्रोल दर स्थिर
वडबारी पाड्यावरील गणेश रमेश झिरवाळ व अंबादास महाले हे दोघे नाशिकहून दुचाकीने गावाकडे येत होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास नाशिक-पेठ महामार्गावर उमराळे नजिक समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. यात गणेश झिरवाळ याचा जागीच मृत्यू झाला. तर अंबादास यात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दोघेही तरुण सुशिक्षित व परिसरात परिचयाचे होते. गणेश हा पोलीस पाटील रमेश यांचा मुलगा होता. तो विवाहित असून अंबादास अविवाहित होता. दोन्ही तरुणांवर आज वडबारी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून या महामार्गावर येणाऱ्या गावाजवळ गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.