नाशिक - बागलाण तालुक्यात दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांत दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या जायखेडा येथील ३२ वर्षीय तरुणाचा व सटाणा येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन खडबडून जागे झाले असून, खबरदारीच्या विविध उपाययोजना अवलंबिण्यात येत आहेत.
जायखेडा येथे मृत तरुणाच्या राहत्या घरापासून ३०० मीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. हा तरुण खासगी वाहनचालक असल्याने त्याचा संपर्कात आलेल्या व्यक्ती व कुटुंबीयांना विलगिकरण केंद्रात पाठविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. जायखेडा येथील तरुण गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने तो गावातील खासगी डॉक्टरकडे उपचार घेत होता. बुधवारी, ११ जूनला रात्री त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले. दुर्दैवाने रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.
मृत तरुणाचा सॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या तीन चार महिन्यांत ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व स्वयंसेवक जीवाचे रान करून परिस्थिती सांभाळत होते. मात्र, दुर्दैवाने या माध्यमातून पुन्हा बागलाणच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.