नाशिक- महापालिका पोट निवडणुकीत भाजपला धक्का बसला असून, दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. 22 मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जगदीश पवार तर प्रभाग 26 मधून शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव विजयी झाले आहेत.
नाशिकरोडच्या प्रभाग क्र. 22 मधून भाजपच्या नगरसेविका सरोज आहिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला होता. तर प्रभाग क्र. 26 मधून शिवसेनेचे नगरसेवक यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिल्याने या दोन्ही प्रभागात पोट निवडणूक घेण्यात आली होती.
प्रभाग क्र. 22 मध्ये भाजप असलेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश पवार निवडून आल्याने येथील भाजपची असलेली एक जागा कमी झाली आहे. तर प्रभाग क्र. 26 मध्ये शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव विजयी झाल्याने येथील जागा राखण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे.
हेही वाचा - मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरातून कांदा चोरीला!
नाशिकरोड भागातील प्रभाग क्र. 22 च्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जगदीश पवार यांना 4 हजार 913 मते मिळाली. तर पराभूत भाजप उमेदवार विशाखा शिरसाठ यांना अवघे 1 हजार 525 मते मिळाली. त्यामुळे पवार यांचा 3 हजार 388 मतांनी दणदणीत विजय झाला. तर सिडकोतील प्रभाग क्र. 26 मधून शिवसेनेचे मधुकर जाधव यांचा 2 हजार 812 मतांनी विजय झाला. जाधव यांना 5 हजार 865 मिळाली, तर मनसेचे दिलीप दातीर यांना 3 हजार 053 मते मिळाली.
हेही वाचा - नाशिकमध्ये सोन्यापाठोपाठ, पेट्रोलच्या दरातही वाढ