मनमाड (नाशिक) - जागतिक योग दिनानिमित्त, अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी येणाऱ्या ट्रेकर्स व वृक्षप्रेमी तरुणांनी आज किल्ल्यावर महंत ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली योगासने केली. यानंतर किल्यावर वड, बेल, चिंच यासह आयुर्वेदिक वृक्षांची लागवड केली.
मनमाड येवला रोडवर अगदी हाकेच्या अंतरावर अंकाई टंकाई ही किल्ल्याची जोडगळ आहे. या ठिकाणी अगस्ती मुनी यांचे मंदिर आहे. हा किल्ला पुरातन काळातील म्हणून ओळखला जातो. तसेच हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. यामुळे अंकाई किल्ला हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. पर्यटक सुट्टीच्या दिवशी तर काही ट्रेकर्स रोज येथे येतात. मनमाड शहरासह येवला, नांदगांव, चांदवड तसेच नाशिक, मालेगाव, धुळे येथून देखील गिर्यारोहक व पर्यटक येथे सहपरिवार येतात.
मनमाड येथील ट्रेकिंग ग्रुप व वृक्षप्रेमींनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन, अगस्ती मुनी मंदिराचे महंत ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली योगा केला व त्यानंतर औषधी वनस्पतींच्या झाडांची लागवड केली. यावेळी महंत ज्ञानेश्वर माऊली यांनी योगा करण्याचे फायदे सांगितले. तर औषधी वनस्पतीची सर्वांनाच गरज भासते, त्यामुळे आपण राहतो त्या परिसरात जास्ती जास्त झाडांची लागवड करण्याचे आवाहन, महंत यांनी केले.
सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपली रोग प्रतिकारकशक्ती चांगली असण्याची गरज आहे, त्या दृष्टीने आम्ही रोज सकाळी न चुकता अंकाई किल्ला व परिसरातील डोंगरावर भटकंती करत असतो. त्यामुळे आमचा व्यायामही होतो व सकाळी सकाळी शुद्ध हवादेखील मिळते, असे ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. तसेच अंकाई किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. यावेळी बाळू गोसावी, सुनील पवार, भिला वडगर, शंकर अंजनवाड, संदीप वणवे, मुदसर शेख, सचिन रानडे, दत्तू शिंदे, स्वराज करकाळे, शिवा पाटील, प्रवीण वडगर, प्रदीप गायकवाड, महेंद्र बोरसे, लक्ष्मीकांत दरवडे, सुनील पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा - विधी शाखेच्या आवेदन पत्राची मुदत वाढवून द्यावी; नाशिकमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे लाक्षणिक उपोषण
हेही वाचा - कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 8 दिवस नाशिकमधील मुख्य बाजारपेठ बंद; व्यापाऱ्यांचा निर्णय