नाशिक - देशाची हवाई सुरक्षा करणाऱ्या सुखोई आणि मिग विमानांची देखभाल करणारा नाशिक हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखाना 28 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. या कारखान्यात कर्मचारी आणि वसाहतीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची कुटुंब कोरोनाबाधित झाली आहेत. आतापर्यंत एकूण चौदा कर्मचाऱ्यांचा तर त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.त्यामुळे नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखाना गेल्या मंगळवारपासून बंद असून तो पुढे 28 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. सध्या कर्मचारी आणि त्यावर अवलंबून असलेले असे २५० जण बाधित आहेत. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी कर्मचारी संघटना करत आहेत.
नोट प्रेसही बंद
नाशिकमध्ये वेगाने वाढणाऱ्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी तसेच करन्सी नोट प्रेस 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.नोट प्रेस मध्ये अनेक कामगार तसेच त्यांचे कुटुंब कोरोना बाधित झाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांच्या काळजी पोटी हा निर्णय घेण्यात आला आहे. एक मे महाराष्ट्र दिन व दोन मे रविवार यामुळे प्रेसमधील कामकाज पुढील काही दिवस ठप्प रहाणार आहे.
हेही वाचा - मोफत लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम