नाशिक - सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथे घरगुती वापरासाठी मुरूम खोदकाम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली.
हेही वाचा - नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा विचित्र अपघात! दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने 21 ठार, 35 जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोकडपाडा शिवारात सहा युवक घरगुती वापरासाठी मुरूम आणण्यासाठी गेले होते. खड्ड्यातून मुरूम खणून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ते टाकत होते. वरवर मातीचा थर असल्याने गुहेसारखे खोदकाम करून आतील निव्वळ मुरूम काढत असतानाच अचानक मातीचा थर ढिल्ला झाल्याने ढिगारा खाली कोसळला. त्यावेळी ढिगाऱयाखाली दिनेश फुलाजी खांडवी (22), मनोहर फुलाजी खांडवी (19) व गोविंद गुलाब खांडवी (23) हे दबले गेले.
यामध्ये दिनेश व मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सिताराम बंगाळ, राजेंद्र खांडवी, मंगेश गावित हे तिघेजण माती टाकण्यासाठी ट्रॉलीकडे गेल्यामुळे ते बचावले. आरडाओरड होताच ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यांनी मदतकार्य सुरू करुन तिघांनाही बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी दोन भावांचा मृत्यू झाल्याचे डॉ. पांडोले यांनी तपासणी करून घोषित केले. तर ,गंभीर जखमी गोविंद याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले जात असताना वाटेत दिंडोरीजवळ गोविंदचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तिघांच्या मृत्यूने रोकडपाडा व परिसरात शोककळा पसरली आहे.