नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षाची बालिका ठार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर जवळील ब्राह्मणवाडे गावातील कोरडे कुटुंबातील साडे तीन वर्षाची बालिका नयना घराच्या अंगणात खेळत होती. अशात बुधवारी नऊ वाजेच्या सुमारास शेतीतून आलेल्या बिबट्याने तीच्यावर झडप घालुन तिला पळवले. घरातील माणसांनी आरडाओरडा करत पाठलाग केला, मात्र काही मिटर अंतरावर बिबट्या नयनाला टाकुन पळाला. मात्र मानेवर गंभीर जखम झालेली नयना जागीच गतप्राण झालेली होती.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरे : या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे ,वनपरिक्षेत्र अधिकारी आदी घटनास्थळी दाखल झाले. बालीकेचा मृतदेह त्र्यंबकेश्वर ग्रामीण रूग्णालयात आणला होता. धुमोडी, वेळुंजे आणि यावेळेस ब्राह्मणवाडे असे एकाच परिसरातील गावांमध्ये आतापर्यंत तीन बालके बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरे लावले लावण्यात येतील, असे वन विभागाने सांगितले आहे.
बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांना बिबट्याचे हॉटस्पॉट संबोधले जाते. या तालुक्यात गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत आहेत. त्यामुळे या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्यांना लपण्यासाठी तसेच प्रजननासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा आहे. तसेच त्यांना आसपास भक्ष्यदेखिल अगदी सहजरित्या मिळते. त्यामुळे हे ठिकाण बिबट्याचे हॉटस्पॉट बनले आहे.
अशी घ्यावी काळजी : नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे बिबट्यांना लपण्यासाठी हि चांगली जागा असते. ऊसतोड करतांना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले झाल्याचे समोर आले आहे. अशात शेतकऱ्यांनी मजुरांनी देखील काळजी घेणे देखील गरजेचे आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी. ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस वन प्राणी जवळ येणार नाही. अनेक वेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे, अशात पालकांनी काम करतांना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.