नाशिक - नाशिकच्या सातपुरा कॉलनीत एक मोठी चोरीची घटना घडल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी तब्बल 65 तोळे सोने आणि 42 हजार रुपये रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. यामुळे पोलीसही हैराण झाले आहेत.
65 तोळे सोने, 42 हजार लंपास
नाशिकच्या सातपुरा कॉलनीत राहणारे साहेबराव नेमणार हे शुक्रवारी (4 जून) आपल्या कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यानीं रात्रीच्या सुमारास नेमणार यांच्या घराच्या दरवाजाची कडी-कोंडा तोडला. घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले 65 तोळे सोने आणि 42 हजार रुपये घेऊन पळ काढला.
साहेबराव नेमणार शनिवारी (5 जून) सकाळी घरी येताच घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी सातपूर पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनीही लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरटे मात्र कसे आले? कुठुन आले? याच्या चौकशीसाठी परिसरात कुठे सीसीटीव्ही आहेत का? त्यात चोरटे कैद झालेत की नाही? याबाबत अधिक तपास सातपुरा पोलीस करत आहेत.
हेही वाचा - कोरोना लसीकरण; नागपुरात लहान मुलांच्या मानवी ट्रायलला सुरुवात