नाशिक - शहरावर आज सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत होत्या. मात्र, असे असले तरी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सकाळी नागरिक मोठ्या प्रमाणत घराबाहेर पडले होते. गेल्या चार दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात ढगाळ वातावरणही आहे.
नागरिकांनी घेतला गुलांबी थंडीचा आनंद -
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सतत वातावरणात बदल जाणवत आहे. आज सकाळी नाशिक शहर धुक्यात गुडूप झाले होते. संपूर्ण शहरावर धुक्याची पांढरी चादर पसरली होती. या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नाशिककर मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. जॉगिंग ट्रॅक सोबत शहरातील गोदाघाट परिसरातही नागरीकांची गर्दी झाली होती. मात्र, या बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. वातावरणाच्या लहरीपणाचा द्राक्ष, कांदा या पिकांना सर्वाधिक फटका बसत आहे.
दिंडोरीतील द्राक्ष उत्पादक चिंतेत -
दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. वातावरणातील वाढलेला गारवा आणि त्यातच रिमझिम पाऊस पडत असल्याने द्राक्षाच्या घडांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण राहिल्यास द्राक्ष फळांवर भुरी पडणे, पाने गळणे, वाढ खुंटणे असे रोग पडू शकतात. द्राक्ष बाग वाचवण्यासाठी आता कोणती औषध फवारणी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. औषध फवारणीमुळे द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडेल. तसेच, कांदा पिकांवरही करपा रोग पडण्याची शक्यता असल्याचे जाणकार शेतकरी सांगतात. आधीच कोरोना आणि आता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.