सटाणा (नाशिक) - बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गावात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईहून ठेंगोडा येथे आलेल्या दाम्पत्यास त्रास जाणवू लागल्याने सुरुवातीस त्यांनी खासगी डॉक्टरकडून घरीच उपचार घेतले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने ते नाशिक येथे उपचारासाठी रवाना झाले होते. त्यांचा तेथे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आल्याने या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या जोडप्यासोबत एक वयोवृद्ध महिला असल्याचे समजते. या दोघांच्या मुंबईहुन आल्याबाबत प्रशासनाला माहिती का दिली नाही, या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर प्रशासनाकडून सतर्कता म्हणून खबरदारीचे उपाय राबविले जात आहेत. बाधितांच्या निवासस्थानापासून ३०० मीटरचा परिसर कंन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.