नाशिक - रविवारी सकाळच्या सुमारास सिन्नर रस्त्यावर असलेल्या टॉप कार या दुकानात काही अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मात्र या चोरट्यांनी चोरीसाठी लढवलेल्या युक्तीमुळे पोलीसही अचंबित झाले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी पीपीइ किटचा आधार घेत चोरी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या, त्यानंतर आता अंगात बारदान घालून चोरट्यांनी सिन्नर रोडवर असलेल्या टॉप-कार या दुकानात चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. संचारबंदीमुळे सिन्नर येथील विशाल पांगारकर यांचे टॉप कार हे दुकान गेल्या महिनाभरापासून बंद आहे. रविवारी सकाळी या ठिकाणी दुकानात साफसफाई करण्यासाठी कामगार आल्यानंतर गाडीचे स्पेअर पार्टस, मशिन्स यांसारख्या वस्तूंची चोरी झाली असल्याचं उघड झाल्याने, पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र चोरांनी चोरी करण्यासाठी लढवलेल्या अजब युक्तीमुळे पोलीस देखील अचंबित झाले आहेत. या चोरट्यांनी अंगात बारदान घालून ही चोरी केली असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
पोलिसांसमोर चोरांची ओळख पटवण्याचे आव्हान
संचारबंदीमुळे गेल्या महिनाभरापासून हे दुकान बंद आहे, यामुळे आधीच दुकान मालकावर आर्थिक संकट ओढवले असताना चोरट्यांनी या ठिकाणी हात साफ केल्याने अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. मात्र चोरट्यांनी लढवलेल्या या अनोख्या युक्तीमुळे चोरांना पकडण्याच मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.