नाशिक - नाशिकमध्ये धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या या धरणातून १२ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी काल (रविवार) पेक्षा आज कमी झाली असून पुराची तीव्रतादेखील कमी झाली आहे. सध्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील पाणी कमी झाले आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या वाढू शकतात.
जोरदार पावसामुळे आज नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सकाळी काही प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने दुपारनंतर उघडीप घेतली. दरम्यान, रविवारी पूर भागात नियमांचे उल्लंघन केलेल्या २४ नागरिकांवर पोलिसांनी कलम १४४ अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे पूर बघण्यास आलेल्या लोकांची गर्दीदेखील कमी दिसून आली.