नाशिक(दिंडोरी) - गोंडेगाव येथील शेतकऱ्याचे दुकानदाराने चुकीचे बियाणे दिल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. भूषण शेटे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी कृषी विभागाकडे केली असून कृषी विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे.
दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव येथील लता प्रदिप शेटे यांच्या मालकीच्या शेतात दोन एकर क्षेत्रात कुरमुरे वालाचे उत्पादन घेण्यासाठी बियाणे लावण्यात आले. पंचवटी येथील मे. मानकर अँड सन्स यांच्याकडून हे बियाणे मागील वर्षी १९ सप्टेंबर, २१ सप्टेंबर, २६ सप्टेंबर व ७ ऑक्टोबर रोजी खरेदी करण्यात आले होते. त्याची रक्कम शेटे यांनी दुकानदाराला ऑनलाईन पद्धतीने अदा केली. संबंधित शेतकऱ्याने सदरचे बियाणे शेतात पेरल्यानंतर साधारण दोन ते अडीच महिन्यानंतर त्याला वालाच्या शेंगा लागल्या. मात्र, त्या कुरमुरे वालाच्या न येता वेगळ्या जातीच्या शेंगा वेलीला लागल्या. वेलीला आलेल्या वालाच्या शेंगांना बाजारात कुठलीही मागणी नाही व तिला भाव देखील मिळत नाही. त्याचे उत्पन्न देखील अतिशय कमी प्रमाणात येते. शेतकऱ्याने याबाबत संबंधित दुकानदार व बियाणे कंपनीकडे विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. संबधित शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. ऑनलाईन पद्धतीने दुकानदाराला पैसे दिले असल्याने पोलिसांनी बँकेकडून माहिती घेत शेतकऱ्याला बियाणांची पावती परत मिळवून दिली. मात्र, फवारणी आणि इतर पीक मशागतीचा खर्च शेतकऱ्याला मिळाला नाही. त्यानंतर शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तक्रार नोंदवली. तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे, एल. पी. गायकवाड, विद्यापीठ शास्त्रज्ञ व तंत्र अधिकारी चौधरी, पंचायत समिती कृषी अधिकारी दिपक साबळे, ज्योतिबा हट्टीरेगे पाटील, विक्रेता प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या पिकाचा पंचनामा करण्यात आला. दुकानदाराची आणि बियाणे कंपनीची चूक निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन शेतकऱ्याला देण्यात आले.
एकंदरीत झालेल्या फसवणुकीत शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. वालाच्या शेंगाचे उत्पन्न घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणावर केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. पिक उभे करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची देखील परतफेड त्यांना करावी लागत आहे. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी भुषण शेटे यांनी केली आहे.
या प्रकरणात संबंधित शेतकऱ्याने बिलासह रीतसर तक्रार कृषी विभागाकडे नोंदवली आहे. त्यानुसार शेतीला भेट देवून पंचनामा करण्यात आला आहे. संबंधित कंपनीची रीतसर चौकशी होवून त्यात चुकीचे निष्पन्न झाले, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यात सखोल चौकशी करून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी सांगितले .