नाशिक - बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे सात महिन्यांच्या गरोदर असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना काल (मंगळवार) समोर आली.
दरम्यान, ही हत्या की आत्महत्या याची उकल अद्याप झाली नसली, तरी मृत पीडितेच्या मामाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पित्याला सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तळवाडे दिगर येथील एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सोमवारी (दि. 25 नोव्हें) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरामागे मोकळ्या जागी जळालेल्या अवस्थेत आढळून आला. ती 80 टक्के भाजल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही संतापजनक घटना आज सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर तिचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पीडितेच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार सटाणा पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
5 वर्षांपूर्वीच मृत पीडितेचे मातृछत्र हरपले होते. तेव्हापासून पीडितेचा पिता तिला व तिच्या भावाला सतत घरात डांबून मानसिक आणि शारिरीक छळ करत होता. त्यानेच स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप पिडीतेच्या मामाने केला आहे. दरम्यान, मृतदेहाचे सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. या शवविच्छेदनात पीडितेच्या पोटात सात महिन्याचा पुरुष जातीचा गर्भ आढळून आला.
त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून नराधम पित्याच्या अत्याचारामुळेच मुलगी गरोदर झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. सटाणा पोलिसांनी संशयिताला तत्काळ अटक केली असून, मृत युवतीच्या मामांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित पित्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता जळताना तिच्या भावाला तसेच शेजाऱ्यांना किंचाळण्याचा आवाज नाही. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, याबाबत अनेक चर्चा गावात होत आहे.
हेही वाचा - विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका