नाशिक - आगामी पावसाळी अधिवेशन काळात शिक्षक संघर्ष समितीचे हजारो शिक्षक आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिक्षक संघर्ष समिती अध्यक्ष संगीता शिंदे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त आणि १ नोव्हेंबर २००५ नंतर शंभर टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. या राज्य शासनाच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जुनी पेन्शन संघर्ष समिती याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचा नुकताच निर्वाळा केला. यामुळे राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त आणि १ नोव्हेंबर २००५ नंतर शंभर टक्के अनुदानस पात्र ठरलेल्या सुमारे ४५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झालेले आहे. यात नाशिक विभागातील १० हजारांपेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू केली नाही तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमची संघटना आमरण उपोषण करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या प्रश्नावरील पुढील लढ्यासंदर्भात चर्चा करून नियोजन ठरवण्यासाठी शिंदे यांच्या उपस्थितीत विभागातील शिक्षक-शिक्षकेतरांसाठी या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.