नाशिक - जिल्ह्यातील आदिवासीबहुल दिंडोरी, सुरगाणा आणि कळवण परिसरातील स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडीसोबत बहरला आहे. रंगतदार आणि चविष्ट स्ट्रॉबेरी किरकोळ ग्राहकांना आकर्षित करत असली तरी, घाऊक बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
या भागात पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आणि जमिनीची पोत यामुळे सात-आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यामध्ये स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा होत आहे.
हेही वाचा - हंगामातील पहिली स्ट्रॉबेरी नवी मुंबईत दाखल
नगदी पीक असलेल्या स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात थोड्याफार प्रमाणात पैसा खेळू लागला आहे. मोठे शेतकरी एक किलो, दोन किलोचे खोके मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाझदा येथे पाठवतात. तर काही शेतकरी जागेवरच परिसरातील व्यवसायिकांना स्ट्रॉबेरीची विक्री करातात. बहुतांशी शेतकरी हे स्वत:च वणी, नांदुरी, सप्तश्रृंगी गड, सापुतारा रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे-छोटे स्टॉल उभारुन पर्यटक आणि प्रवाशांना स्ट्रॉबेरी विकताना दिसतात. स्ट्रॉबेरी विक्रीतून परिसरात अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.