नाशिक - परराज्यात विक्रीसाठी आणलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून जाणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. यानंतर निरीक्षक ऋषिकेश फुलझळके यांनी रविवारी (5 जानेवारी) नाकाबंदी केली. सायंकाळी एक ट्रक (एमएच 40 बीएल 4508) मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडमार्गे दिंडोरीच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळाली. यानुसार निरीक्षक फुलझळके यांच्या पथकाने पिंपळगाव-वणी सापुतारा रस्त्यावरील गोंडेगाव फाटा येथे नाकाबंदी केली आणि संशयित ट्रक रोखला.
यावेळी ट्रकमध्ये विदेशी मद्याचे 945 बॉक्स सापडले असून याची किंमत 1 कोटी 4 लाख 33 हजार 700 रुपये आहे. मद्यसाठा आणि टूक असा जवळपास दोन कोटींचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. संबंधित कारवाई उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ऋषिकेश फुलझळके, देवदत्त पोटे, एस.एस. रावते यांनी केली. तसेच यामध्ये दीपक आव्हाड, लोकेश गायकवाड, विठ्ठल हाके यांचाही समावेश होता.
सुताच्या दोऱ्याचे बंडल असल्याचे केले नाटक
हरियाणा, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यावेळी कारवाईदरम्यान मद्याच्या बाटल्या सुताच्या दोऱ्यांनी बांधलेल्या बंडलमध्ये असल्याचे तस्करांकडून भासवण्यात आले. या बंडलच्या मागील बाजूस असलेल्या प्लायवूडमध्ये तब्बल 1 कोटी 5 लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. नवीन वर्षातील या पहिल्याच मोठ्या कारवाईने मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांना दणका बसला आहे.
आधिकाऱ्यांची सतर्कतेने बिंग फुटले
गोंडेगाव फाट्यावर ट्रक रोखताच चालकाने अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. तर दुसरा चालक पळत असताना पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. संशयित सतीश शिव सिंग (रा. खानापूर, धौलपूर, राजस्थान) याने ट्रकमध्ये सुताच्या दोऱ्यांचे बंडल असल्याचे सांगितले. त्यानुसार, ट्रकचे मागील फाळके उघडल्यानंतर दोऱ्यांच्या बंडलाचे पोते ठेवलेले होते. मात्र, निरीक्षक फुलझळके यांना मिळालेली खबर पक्की असल्याने त्यांनी पथकातील आधिकाऱ्यांना ट्रकवर चढवले आणि झडती घेतल्यानंतर बिंग फुटले. गेल्या आठवड्यातही याच पथकाने सुमारे पाऊण कोटींचा मद्यासाठी स्पिरिटने भरलेला टँकर पकडला होता.