नाशिक - निफाड तालुक्यातील विंचूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी पावणेपाच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. औरंगाबाद राज्यमार्गावर सोमवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा.... हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
निफाड तालुक्यातील विंचूर येथे नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावर असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. सोमवारी पहाटे चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील अंदाजे पावणेपाच लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच पोलीस उपअधिक्षक माधव पडिले यांनी तात्काळ तीन पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी पाठवली आहेत.
हेही वाचा... 'प्रोटॉन' थेरपी ठरणार कर्करोगावर वरदान