नाशिक - गेल्या 3 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यातच आता एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन तात्काळ द्या, अन्यथा दिवाळीच्या तोंडावर एसटी बंद आंदोलन करू, असा घरचा आहेर काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. यामुळे हे कर्मचारी संतप्त झाले असून तात्काळ थकीत वेतन द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा सूचनावजा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला होता. दरम्यान यातच आता इंटकचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. दिवाळीआधी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करा, अन्यथा महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशारा त्यांनी दिला आहे. याच बरोबर शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्याने महामंडळाची वाट लागली असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
हेही वाचा - 'थकबाकी असलेले वेतन द्या, अन्यथा आंदोलन करू,' एसटी कर्मचार्यांचा इशारा
ऐन दिवाळीत वेतनाचा प्रश्न चिघळणार -
दरम्यान, कोरोना काळात काम करून देखील पगार थकवण्यात आल्याने हे कर्मचारी संतप्त झाले असून वेतन देण्यात यावे, यासाठी कामगार उपायुक्त गुलाब दाभाडे यांच्याकडे इंटक च्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न चिघळणार आहे.
हेही वाचा - नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; दोन महिन्यांपासून थकले वेतन