नाशिक - जिल्ह्यातील वणी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तीन तरुणांना धावत्या बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेमुळे शिरवाडे वणी गावावर शोककळा पसरली आहे. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करत आंदोलन केले.
तीन तरुणांचा जागीच मृत्यू - पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवाडे वणी येथील तरुण शेतकरी महेश चंद्रकांत निफाडे (वय ३६), नितीन भास्कर निफाडे (वय ३६), सुभाष माणिक निफाडे (वय ३६) हे तरुण पिंपळगावहून दुचाकीने शिरवाडे वणीकडे येत होते. त्यावेळी शिरवाडे वणी फाट्याजवळ दुचाकी गावाकडे महामार्ग ओलांडत असताना चांदवड बाजूकडून राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदात होती की या घटनेत तीनही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर एकाचवेळी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची गावातील ही पहिलीच वेळ होती. कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशामुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.
एसटी बसची जोरदार धडक - चांदवड बाजूकडून राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेने दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या परिसरात अनेक अपघात होत आहेत. याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांचा रास्ता रोको - शिरवाडे वणी फाट्याजवळ योग्य पद्धतीने स्पीड ब्रेकर बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असतो. वाहनांची गती कमी होत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर अनेकवेळा निवेदन देऊनसुद्धा उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा - YouTuber Devraj Patel : 'दिल से बुरा लगता है भाई' फेम युट्यूबरचे अपघाती निधन