नाशिक - येवला तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राजकीय पदाधिकारी व व्यापारी असोसिएशनने तीन दिवस 'जनता कर्फ्यु' पाळण्याचे आवाहन केले होते. यावेळी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवार (23 जून) ते गुरुवार (25 जून) असा तीन दिवस जनता कर्फ्यु पाळणार असून आज पहिल्याच दिवशी या कर्फ्युला मोठा प्रतिसाद मिळाला. आज मोठ्या प्रमाणात दुकानं बंद होती. सध्या शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. बाजारपेठांमध्ये देखील तुरळक नागरिक आल्याचे पाहायला मिळाले.
वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अनेक बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामार्फत मोठ्या प्रमाणात तपासण्या पार पडत आहेत. आतापर्यंत तालुक्यात एकूण 111 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यातील 56 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 48 जणांवर उपचार चालू असून आठ जणांचा मृत्यू झालाय.
मात्र आज नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळल्याने शहरातील सर्व व्यवहार थंडावले होते.