नाशिक : नाशिक शहर तसेच जिल्ह्यात दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विविध मंडळ, वेगवेगळे देखावे सादर करत असतात.मात्र अशोक स्तंभ मित्र मंडळ दरवर्षी अनोखा देखावा साकारत असतात,गेल्या दहा वर्षांपासून त्यांचं स्वप्न होतं की शिवरायांची मूर्ती ही भव्य दिव्य साकारायची आणि यावर्षी अखेर 61 फूट उंच,22 फूट रूंद आणि तब्बल 3 हजार किलो शिवरायांची मूर्ती साकारली आहे.आत्तापर्यंत शिवजयंतीला देशभरात कोणीही इतकी मोठी शिवरायांची मूर्ती साकारली नसल्याचा दावा अशोक स्तंभ मित्र मंडळांनी केला आहे
12 दिवसात साकारली मूर्ती : शिवजयंती निमित्त त्र्यंबकेश्वर रोडवरील एच.पी. ब्रदर्स आर्ट्सचे हितेश व हेमंत पाटोळे यांनी ही मूर्ती तयार केली आहे.मूर्ती बनवण्यासाठी 12 दिवस 50 कारागिरांनी मेहनत घेतली आहे,या मूर्तीसाठी एफआरपी फायबर प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. तसेच,आतील साचा स्टीलपासून बनवण्यात आला आहे.पुतळा साकारण्यासाठी तब्बल चार टन एफआरपी फायबर तर,चार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
शिवभक्तांनी केली मात : छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवत असताना एक मोठे संकट ओढवले. अचानक कार्यशाळेत शॉर्टसर्किटने आग लागली. त्या आगीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर मूर्तीकारांच्या हाती अवघा 19 दिवसांचा कालावधी राहिला. एवढ्या कमी वेळात त्या मूर्तीकारांनी नव्याने मूर्ती तयार केली. महाराजांच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया मूर्तीकार हितेश पाटोळे यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे.
71 किलो वजनाची कवड्यांची माळ : शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती सेनेने 21 फूट लांबीची आणि 71 किलो वजनाची 64 कवड्यांची माळ तयार केली आहे. ही माळ सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. शिवप्रेमी ही माळ बघण्यासाठी गर्दी करत आहे. वंडर बुक ऑफ रेकॉर्डने तिची नोंद केली आहे. नाशिकमध्ये दरवर्षी छत्रपती सेना एक आदर्श शिवजन्मोत्सव साजरा करत असते अशी त्यांची ओळख आहे. शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे प्रतीक असलेल्या वस्तूंचे मोठ्या स्वरूपात सादरीकरण करण्याकत येते. त्या वस्तूंचे महत्त्व जनतेसमोर सादर करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून यावर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती सेनेने 21 फूट लांबीची आणि 71 किलो वजनाची 64 कवड्यांची माळ छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तयार केली आहे. बडोदा येथे प्रत्येकी एक फूट उंचीच्या कवडी तयार केल्या गेल्या आहेत. नाशिकमध्ये कवड्यांना कोटिंग, कलरिंग करण्यात आले होते. आठ कारागिरांनी दीड महिन्यात ही भव्यमाळ तयार करून दिली आहे.
हेही वाचा : Shiv Jayanti 2023 : प्रत्येक किल्ल्यांवर का असतात शिव मंदिर? पाहा काय आहे इतिहास