नाशिक : घरगुती वाढीव वीजबिलांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी वीजबिलांची होळी करण्यात आली. लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांचे घरगुती वीजबिल माफ करावे व दरमहा शंभर युनिट मोफत वीज द्यावी, अशी मागणी यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सटाणा, देवळा, दिंडोरी, मालेगावसह विविध भागात वीजबिलासंदर्भात आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांचे घरगुती वीजबिल वीज कंपन्यांनी महाराष्ट्रभर वाढीव दराने ग्राहकांना दिले आहे. कोरोनामुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक, मजूर यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात वाढीव बिल देऊन वीज मंडळाने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. म्हणून या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यातील तहसील कार्यालयांवर सर्वपक्षीय वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सध्याच्या काळात जनतेला आधार देण्याची गरज असताना पेट्रोल डिझेलच्या रूपानं केंद्र शासन जनतेच्या खिशारवर दरोडा टाकत आहे तर, वीज बिलांच्या रुपाने राज्य शासनाने लूट चालवली आहे. जनतेची अधिकाधिक लूट कशी करता येईल, अशी केंद्र आणि राज्य शासनाची स्पर्धा सुरू आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या लुटीच्या विरोधात जनतेच्या तीव्र भावना आहे. म्हणून दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तीन महिन्यांचे वीजबिल शासनाने माफ करावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.
या आंदोलनात माजी आमदार रामदास चारोस्कर, प्रांतिक सदस्य सोमनाथ बोराडे, गंगाधर निखाडे, ज्योती देशमुख, दिलीपराव जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तालुका अध्यक्ष मधुकर पाचपिंडे, युवा अध्यक्ष महेंद्र बोरसे वसंतराव कावळे, वसंतराव थेटे, गणेश हिरे, राकेश शिंदे, संपत जाधव, अभय सूर्यवंशी, सचिन कड, दत्ता सोनवणे, किरण पाटील, नारायण संधान, शंकर फुगट, संजय आप्पा थोरात, योगेश संधान, अजय पाटील, प्रभाकर मोरे, जयराम फुगट, आनंदा वाघ, गोरख लभडे, विश्वास संधान, वैभव जगताप, सतीश सोनवणे, सचिन लभडे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.