सटाणा (नाशिक)- बागलाण तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाचा तपास अवघ्या २४ तासात लावण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी प्रेयसी व प्रियकराला अटक करण्यात आली आहे. हर्षदा अरुण सोनवणे (वय 26 रा. चौगाव रोड, सटाणा) व रवि सुरेश खलाले (वय 36 रा.मंगल नगर, सटाणा) असे अटक करण्यात आलेल्या प्रेयसी व प्रियकराचे नाव आहे. मृताचे नाव मृत राजू सरदार असे आहे.
गुरुवारी (14 मे) सकाळी सात वाजता दोधेश्वर घाटात इंडिगो मांझा कारमध्ये एक मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती. ही कार सटाणा शहरातील सम्राट म्युझिकलचे संचालक राजू सरदार यांची असल्याची खात्री होताच सटाणा पोलिसांनी राजू सरदार यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देत घटनास्थळावर पाचारण केले होते. मृत राजू सरदार यांच्या शरीरावरील जखमा आणि इतर परिस्थिती पाहता त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. राजू सरदार यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार सटाणा पोलिसांनी 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
मृत राजू सरदार यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती नाशिक सायबर पोलिसांना दिली असता रात्री अकरा वाजता त्यांचा मोबाईल बंद झाला होता. सायबर पोलिसांनी मोबाईल बंद होण्यापूर्वी त्यांच्या संपर्कात कोण आले, याचा सखोल अभ्यास करून शेवटी आलेल्या कॉलची तपासणी केली असता सटाणा शहरातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हा फोन असल्याची खात्री सटाणा पोलिसांना झाली. या अल्पवयीन विद्यार्थ्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या विद्यार्थ्यांची मामी हर्षदा अरुण सोनवणे (वय 26) ही माझा मोबाईल रात्री साडेदहा वाजल्यापासून ताब्यात घेऊन घराबाहेर गेल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी हर्षदा सोनवणेला ताब्यात घेतले.
खून केल्यानंतर दोघांनी राजू सरदार यांना मृत अवस्थेत उचलून त्यांच्याच कारमधील मागील सीटवर त्यांचा मृतदेह ठेवला. रवीने टाटा मांझा कार तर हर्षदाने स्वत: रवीची मोटारसायकल चालवित दोधेश्वर घाटात आले. तेथे त्यांनी राजेंद्रचा मृतदेह असलेली कार न्यूट्रल करून तिला घाटात ढकलून दिले आणि मोटारसायकलने घरी पोहोचले, अशी कबुली त्यांनी पोलिसांनी दिली.