नाशिक - केंद्र सरकारचा 40 हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचा खुलासा कर्नाटकातील भाजप नेते हेगडे यांनी केला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी असल्याचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
फडणवीस यांनी यासाठी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असेल, तर त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य राऊतांनी यावेळी केले. यासोबतच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुलासा करतील. यात काळंबेर नक्कीच असून सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच आरे प्रमाणेच नानार प्रकल्पातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले. बुलेट ट्रेनच्या उपयुक्ततेबाबत शरद पवार यांनीही शंका उपस्थित केली होती. त्यामुळे त्याबाबत लवकरच निर्णय स्पष्ट होईल आणि राज्य सरकारचा पैसे जाणार असेल, तर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता ?
अनेक नेते आमच्या संपर्कात असून पंकजा मुंडेची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होणार असल्याचा खुलासा राऊत यांनी केला आहे. तर, खातेवाटपाबाबत बोलताना ते म्हणाले, गृहमंत्री पद शिवसेनेकडे की राष्ट्रवादीकडे जाणार आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकासआघाडीमध्ये कोणतेही मतभेद आणि भांडणे नसल्यचेही त्यांनी स्पष्ट केले.