नाशिक Sudhakar Badgujar and Salim Kutta : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा एका पार्टीत नृत्य करीत असल्याचा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. यावरून गेल्या सहा दिवसांपासून बडगुजर यांची चौकशी सुरू आहे. सलीम कुत्ता आणि बडगुजर यांची कारागृहात भेट झाली असावी असं बोललं जातंय. त्यामुळं शहर पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून यासंदर्भात नोंदी मागवल्या आहेत. त्यानंतर दोघांची कारागृहातील भेट केव्हा, कशी आणि किती वेळ झाली याचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवलीय. त्यामुळं सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
'ते' फार्महाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचं : नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने सहाव्यांदा बडगुजर यांची चौकशी केली. जवळपास दीड तास बडगुजर यांची चौकशी करण्यात आली. यावेळी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओसंदर्भात महत्त्वाची माहिती उघड झालीय. ज्या ठिकाणी पार्टी झाली ते फार्महाऊस आडगाव भागातील हिंदुस्थाननगर येथील असून बडगुजर यांच्या नातेवाईकांचंच असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या पार्श्वभूमिवर पोलिसांनी फार्म हाऊसची पाहणी केली आहे. तसंच या प्रकरणी आतापर्यंत 18 जणांची चौकशी केल्याचं सांगितलं जातंय.
बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची पार्टी कुठे झाली याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आडगाव येथे असलेल्या फार्म हाऊसची पाहणी आमच्या टीमने केली आहे. हे फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकाचं असल्याचं समोर आलंय. तसंच आरोपी सलीम कुत्ता हा जन्मठेपेच्या शिक्षेत पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असून त्याच्यासंबंधीत हा व्हिडिओ असल्यानं त्याची चौकशी आणि जबाब नोंदवणे कमप्राप्त ठरणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून गृह विभाग कारागृहप्रशासनाकडं कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे. तसंच या प्रकरणी आतापर्यंत 18 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. - विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
एसीबीकडून होणार चौकशी : सुधाकर बडगुजर यांची भ्रष्टाचार आणि अपहार गुन्ह्यात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी (22 डिसेंबर) चौकशी केली जाणार आहे. या संदर्भातील नोटीस दोन दिवसांपूर्वीच काढण्यात आली होती. पण चौकशीसाठी बडगुजर यांनी आठ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, त्यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली.
अडकवण्याचा प्रयत्न : सलीम कुत्ता व्हिडिओ प्रकरण असो की एसीबीच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार, हे सर्व फक्त राजकीय हेतूनं प्रेरित असून यात काही तथ्य नाही. तसंच एमडी प्रकरणात सत्ताधाऱ्यांविरोधात काढलेल्या मोर्चांमुळं अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केलाय.
हेही वाचा -