नाशिक - बऱ्याच वेळा भारतातील रुग्ण अत्याधुनिक सोईसुविधा मिळाव्यात म्हणून परदेशात शस्त्रक्रिया करण्यासाठी जातात. परंतु, आता भारतही आरोग्य क्षेत्रामध्ये मागे राहिला नाही. हृदयविकाराच्या रुग्णांवर करण्यात येणारी एन्जोप्लास्टी ही किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी आता रोबोटचा वापर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये प्रथमच केला जात आहे.
भारतात अशा अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून हृदयविकाराची शस्त्रक्रिया करणारे नाशिक हे देशातील दुसरे शहर असून या यंत्राद्वारे ५० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अशी ८ रोबोटीक यंत्रे अमेरिकेमध्ये असून दक्षिण आशिया आणि युरोपात खंडातील दुसरी रोबोटीक एन्जोप्लास्टी सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे.
हृदयरोगावर रोबोटीक तंत्रज्ञानाद्वारे उपचार आणि तेही महाराष्ट्रात, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र, नाशिकचे हृदयरोग तज्ञ मनोज चोपडा यांनी हे शक्य करून दाखवले आहे. भारतातील हा दुसराच रोबोट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुणे या मोठ्या शहरांना मागे टाकत आता पहिला रोबोट नाशिकमध्ये मॅग्नम हार्ट इस्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. डॉ. मनोज चोपडा यांनी या प्रणालीसाठी विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
या रोबोटच्या साहाय्याने किचकट अशा हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात येतात. रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करताना जास्त अचूकता साधता येत असल्याचे डॉक्टरांचा दावा आहे. या रोबोट आर्मची किंमत तब्बल ५ कोटी रुपये असून याद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे खास प्रक्षिक्षण डॉ.चोपडा यांनी जर्मनीमध्ये घेतले आहे. अतिशय क्लिष्ट आणि अवघड अशा शस्त्रक्रिया रोबोटद्वारे कुठल्याही अडथळ्याविना करता येतात. यासाठी वेळ देखील कमी लागत असून किरणोत्साराचे प्रमाण देखील कमी होत असल्याचे डॉ. मनोज चोपडा यांनी सांगितले.
विशेष म्हणजे यासाठी रुग्णांना कुठलाही अधिक खर्च द्यावा लागत नाही. आत्तापर्यंत नाशिकमध्ये या रोबोटद्वारे ५० शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. वेळेची बचत आणि अचूक निदान याचबरोबर अधिकची कोणतीही रक्कम देण्याची गरज नसल्याचे हृदविकारावरील ही रोबोट शस्त्रक्रिया रुग्णांसाठी फायद्याची आहे.