नाशिक - नाशिक हा मनसेचा गड मानला जातो. मागील लोकसभा निवडणुकीत मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. २००९ मध्ये हेमंत गोडसे यांना मनसेकडून २ लाख १६ हजार मते मिळाली होती. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत मनसेची मते निर्णायक ठरणार आहेत. यंदा मनसेचा उमेदवार राहणार की नाही, नसेल तर राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार किंवा तटस्थ राहणार, याबाबत आता मनसैनिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेतही मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना ६३ हजार मते मिळाली होती. यंदा मोदी लाट ओसरली असून, निवडणूक अटीतटीची होणार आहे. राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ रिंगणात असून, शिवसेनेच्या उमेदवारीचा घोळ सुरू आहे. वंचित आघाडीनेही पवन पवार यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत मनसेकडे असलेली हक्काची ६० ते ७५ हजारांपर्यंतची मते निर्णायक ठरणार आहेत. ही मते ज्याच्या पारड्यात पडतील, तो विजयी उमेदवार होण्याचीशक्यता आहे. त्यामुळे ही मते कुणाला, अशी चर्चा सुरू झाली आहे
नाशिक महापालिका महापौरपदी मनसेचा उमेदवार निवडला जावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तटस्थ भूमिका घेऊन मनसेला मदत केली होती. तेंव्हापासून राष्ट्रवादी-मनसे यांच्यात चांगले हितसंबंध जुळले होते. त्याची परतफेड मनसे लोकसभा निवडणूकीत करणार का हे पहावे लागणार आहे.
राजकीय विश्लेषक हेमंत भोसले यांच्या मते, राज ठाकरे लोकसभा निवडणुकीमध्ये तटस्थ राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी-अमित शाह यांच्या विरोधात ते प्रचार करणार आहेत. याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी यांना नक्कीच होणार.
याबाबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंजुन टिळे म्हणाले, राज ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. तिचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच होणार आहे. राज ठाकरे यांना मानणारा वर्ग हा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.