नाशिक - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघा जणांना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने के. के. वाघ कॉलेजच्या परिसरातून रंगेहाथ अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये तीन नर्स आणि एका मेडिकल बॉयचा समावेश असल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
बनावट ग्राहक पाठवून आरोपींना अटक
नाशिक शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती भीषण होत असताना, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या के. के. वाघ कॉलेज परिसरात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. नाशिकच्या मुंबईनाका परिसरात असलेल्या फॉर्च्यून हॉस्पिटलमध्ये कार्यरत तीन परिचारिका आणि अपेक्स हॉस्पिटलमधला एक मेडिकल बॉय असे चौघे मिळून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन 54 हजारांना विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली आहे.
आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
आज दुपारी चौघांनाही न्यायालयात दाखल केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, के के वाघ कॉलेज जवळ रेमडेसिवीरची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती, आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून दोन इंजेक्शन किंमत प्रत्येकी 27 हजार विकताना आरोपींना अटक केली आहे.
दोन रेमडेसिवीर जप्त
या आरोपींकडून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. दरम्यान सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील अनेक रुग्णांना रेमडेसिवीरची गरज आहे, याचाच फायदा घेऊन रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची आणखी एक घटना समोर आल्याने जिल्ह्यात खळळबळ उडाली आहे.
हेही वाचा - अमेरिकेत पूर्ण लसीकरण झालेल्यांना मास्कची सक्ती नाही