नाशिक - यंदाही पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याची योजना वादात सापडली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेवून गणवेश वाटपाची प्रक्रिया वेळेवर झाली नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करणे अपेक्षित होते. मात्र आता गणवेश वाटपासाठी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त शिक्षण विभागाने शोधला आहे.
नाशिक महापालिकांच्या शाळेत पहिली ते आठवीतील 29 हजार मुले 90 शाळांमध्ये शिक्षण घेत आहे. त्यापैकी 23 हजार विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण अभियान मधून गणवेश वाटप होणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती-जमातींची आणि दारिद्र-रेषेखालील कुटुंबातील सर्व मुली अशा 23 हजार लाभार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यासाठी 1 कोटी 40 लाख रुपयांचा निधी पालिकेकडे आला आहे. तो निधी शाळा स्तरावर असलेल्या शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग केला जाणार आहे. उर्वरित 6 हजार मुलांना महापालिकेच्या स्वनिधीतून गणवेश देण्यासाठी 43 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रति विद्यार्थी गणवेशासाठी सहाशे रुपये दिले जाणार असून,शाळा स्तरावर कपडा खरेदी व शिलाई करून देणे बंधनकारक आहे. महानगरपालिका गणवेशाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणार आहे.
मागील वर्षी गणवेश खरेदी करतांना शाळा व्यवस्थापन समिती व काही अधिकारी लोकप्रतिनिधी तसेच ठेकेदारांची आर्थिक युती झाल्याचा प्रकार चर्चेत आला होता. या प्रकरणाचे पालिकेच्या महासभेत पडसाद उमटल्यानंतर महापौरांनी तातडीने याप्रकरणाची चौकशी केली होती. तसेच तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी सुरू केली होती. मात्र कालांतराने या प्रकरणाबाबत मौन पाळले गेले होते. त्यामुळे आता हे प्रकरण देखील दडपून टाकले जाणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.