नाशिक : रायगड येथील इर्शाळवाडी येथील अनेक घरे डोंगराखाली गाडली गेल्याची घटना घडली. यात अनेक जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशात आता नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गडाखालील धोकादायक गावांचा मुद्दा चर्चेत आला आहे. सप्तशृंगी गडाखालील नागरिकांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत स्थलांतराची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुफलीची वाडी, गंगाद्वार, पाठरवाडी, विनायक मेट, जांबाची वाडी या पाड्यांनाही धोका संभवतो. त्यामुळे या गावाच्या स्थलांतराबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानुसार गावकऱ्यांनी स्थलांतराची तयारी दर्शवत काही जागा सुचवल्या.
'त्या' जागा वनविभागाच्या अखत्यारितील : गावकऱ्यांनी स्थलांतरासाठी सुचविलेल्या या सर्व जागा वन विभागाच्या अखत्यारित असल्याने याकरिता वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. सध्या ही गावे ज्या जागेवर वसलेली आहेत ती जागा वनविभागाची आहे. वन हक्क कायद्यानुसार या जागा या कुटुंबांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या जीवितला धोका लक्षात घेता डोंगराच्या खाली वन विभागाच्या जागेवर कुटुंबांचे स्थलांतर करून सध्याची जागा वन विभागाने ताब्यात घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
170 कुटुंबांची होणार नवी वसाहत : वनविभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात एक आठवड्यात ग्रामपंचायींतर्फे ठराव करून स्थानिक वनहक्क समितीकडे पाठवावा. स्थानिक समितीने आठवड्याभरात हा प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवावा. समितीच्या निर्णयानंतर या गावांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. यानंतर या पाच पाड्यांवरील 170 कुटुंबांचे स्थलांतर होणार आहे; परंतु तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाकडून स्थलांतरासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
डोंगर भागातील नागरिकांना स्थलांतरित करा: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीची बैठक घेऊन ठाणे जिल्ह्यात असलेल्या डोंगर भागातील वसाहतीचा आढावा घेतला. बऱ्याच ठिकाणी डोंगराळ भागात नागरिक वस्ती करून राहतात. ज्या वस्त्यांना धोका आहे. तिथल्या सर्व वसाहती तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना आढावा पालकमंत्री देसाई यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा: