नाशिक - नाशिक शहरात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरवात झाली आहे. यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्यांना आता पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद द्यायला सुरूवात झाली आहे. पंचवटी पोलिसांचा असाच एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यात पोलीस मद्यपीला चोप देताना दिसून येत आहे.
हेही वाचा - नाशिक शहरात ड्रोनद्वारे केली जाणार सॅनिटायझरची फवारणी
पंचवटी पोलिसांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल
नाशिकच्या पंचवटी परिसरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर रस्त्यावर रिक्षात बसून दारू पिणाऱ्या एका मद्यपीला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मद्यपीला चोप देतानाच हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून पोलिसांच्या या कारवाईला नाशिककरांचा देखील पाठिंबा मिळत आहे.
रस्त्यावर फिरणारे काही नागरिक सूपर स्प्रेडर
संचारबंदी लागू असूनही अनावश्यक रस्त्यावर फिरणारे काही नागरिक सूपर स्प्रेडर ठरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 12 मे पासून 22 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या दरम्यान वैद्यकीय सुविधा वगळता सर्व काही बंद राहणार असून या काळात अनावश्यकपणे घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने या आधीच दिला होता. तरीही लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पंचवटी परिसरात एका रिक्षात बसून एक तरुण दारू पीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी संबंधित ठिकाणी जाऊन या मद्यपीला चांगलाच चोप दिला. यामुळे नाशिककरांनो अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळून पोलिसांना सहकार्य करा.
हेही वाचा - नाशिकमध्ये पहाटेपासून रांगेत लागूनही मिळत नाही लस, ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी