नाशिक - शहरातील व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याची घटना ताजी असताना आता जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपी मशीनही धूळ खात पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या गलथान कारभारामुळे सामान्य नागरिकांना खासगी लॅबमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारकडून आलेले प्लाझ्मा थेरपी मशीन धूळ खात पडून असल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेच्या एका रूममध्ये हे मशीन ठेवण्यात आले आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता ICMRकडून परवानगी मिळत नसल्याने या प्लाझ्मा थेरपी मशीनचा वापर केला जात नसल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. निखिल सैदाने यांनी याविषयी माहिती दिली.
एकीकडे, नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या फाटक्या व्यवस्थेची एका मागून एक प्रकरण समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयातील मशीन बंद असल्याने नागरिकांना प्लाझ्मा थेरपीसाठी खासगी लॅबमध्ये हजारो रुपये मोजावे लागत आहेत. परवानगी मागणारे आणि देणारे हे दोन्ही राज्य शासनाचे विभाग आहेत. तरीही, एका परवानगीसाठी महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने व्यवस्थेतील अधिकारी कोरोनाबाबत किती निष्काळजीपणा करत आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.