नाशिक : गोमांस वाहतुकीच्या संशयातून सिन्नर घोटी महामार्गावर गंभीरवाडी शिवारात दोन व्यक्तींना अज्ञात दहा ते पंधरा जणांकडून मारहाण करण्यात आली होती. यात दोघेही जण गंभीर जखमी झाले होते. यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अफान अन्सारी (वय 32 रा.कुर्ला) असे जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दहा संशयित आरोपींना अटक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर घोटी महामार्गावर गंभीरवाडी शिवारात दोन व्यक्तींना गोमांस वाहतुकीच्या संशयातून दहा ते पंधरा अज्ञात गो रक्षकांनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोलीस पोहचल्यावर त्यांना गाडीची तोडफोड केल्याचे दिसून आले. तर, त्या ठिकाणी दोघे जण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यातील अफान अन्सारी (वय 32 रा.कुर्ला) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून नासीर शेख याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दहा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
15 दिवसातील दुसरी घटना : शहापूर तालुक्यातील विहिगाव येथून 8 जूनला एक टेम्पोत गोवंश घेऊन जात होते. कारेगाव येथे पिकपमध्ये गोवंश जनावरे घेऊन साक्षीदार प्रल्हाद शंकर पगारे यांच्या घरासमोर थांबले होते. यावेळी कारेगावकडून एक झायलो, दोन स्विफ्ट कार आणि सात ते आठ मोटरसायकल घेऊन 15 ते 20 जणांनी हा टेम्पो अडवून त्यातील तिघांना मारहाण केली होती. टेम्पोतील तिघांपैकी अकील गुलाम गवंडी पळून गेला होता. उरलेले दोघे जणांना इगतपुरी जवळील घाटनदेवी मंदिरासमोर आणून रात्रीच्या वेळेस पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली. टेम्पोतील लुकमान सुलेमान अन्सारी हा जीव वाचवण्यासाठी घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या उंट दरीच्या दिशेने पळाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. या घटनेत पाच ते सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - Cow Rescued In Thane : ग्रामीण पोलिसांनी गो-तस्करांच्या तावडीतून ५० जनावरांची केली सुटका, एकाला अटक