नाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीमधील बाॅश कंपनीत विविध मार्गाने तब्बल 8 लाख 35 हजार 553 रूपयाचे पार्टचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे एच. आर. व्यवस्थापक श्रीकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशी सुरू -
12 मेला नाशिकच्या बॉश कंपनीचे वरिष्ठ एच.आर. व्यवस्थापक श्रीकांत चव्हाण यांनी दिलेल्या फियादीनुसार, कंत्राटी भंगार उलचणारे, स्वच्छता निरीक्षक, ओजीटी, काही कायम कामगार यांच्या संघनमताने गेल्या अनेक महिन्यांपासून विविध मार्गाने कंपनीतील विविध पार्ट चोरी झाल्याचा प्रकार कंपनीच्या ऑडिटमध्ये लक्षात आला. जवळपास 8 लाख 35 हजार रुपयांचे पार्ट चोरीला गेल्याची माहिती आहे. यानंतर व्यवस्थापनाने कंपनी अंतर्गत चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलिसांची मदत घेण्यात आली.
हेही वाचा - 'नुसत्या टोप्या घालून राजकारण करू नका; मुस्लिम आरक्षण द्या'
दोन जणांना अटक -
यात पोलिसांनी अनेक ठेकेदार कामगार व ज्या विभागातुन हे पार्ट बाहेर गेले त्या प्राॅडक्शन विभागातील अधिकारी कर्मचारी, ओजीटी आणि कायम कामगारांची चौकशी करण्यात आली. कॅन्टीनमध्ये काम करणारे ठेकेदार कामगार संजय अशोक रोकडे (वय-30, रा. लोकमान्य नगर सिडको) आणि कमलेश सुरेश तिरमले (वय-35, रा. विस्वास नगर, अशोक नगर, सातपूर) या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी दिली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता 16 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात अजून आरोपी निष्पन्न होण्याचे संकेत पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड यांनी दिले आहे.