नाशिक - मालेगावहूननाशिक येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली. प्रसंगावधान राखल्याने रुग्णवाहिकेतील ५ जण बचावले.
मालेगाव येथील शासकीय रुग्णालयातून रुग्णवाहिका एका रुग्णांसह २ नातलगांना घेऊन नाशिक येथे जात होती. बुधवारी रात्री राहुल शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावर आशियाना हॉटेलजवळ आली असताना गाडीतीलऑक्सिजन सिलेंडरने अचानक पेट घेतला. ही घटना लक्षात येताच चालक रोहिदास आहिरे आणि डॉ. इब्राहिम अहमद रियाज अहमद यांनी रुग्ण सुरेखा शांताराम बडे आणि रुग्णाचे नातलग शांताराम बडे, जुलाबाई बडे यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवले.
काही वेळातच रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्नीशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.