मुंबई - नाशिकमध्ये बेडविना कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेला जबाबदार संबंधित अधिकारी आणि इतरांसह सरकारवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.
नाशिकमध्ये योग्य उपचाराअभावी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेच्या अगोदर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मी दौरा केला होता त्या ठिकाणी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या फारच कमी असल्याचे मी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोललो, पण फारसा फरक दिसत नाही. म्हणूनच मी मागणी करतोय की, नाशिक प्रकरणासंदर्भात अधिकारी आणि इतर लोक यांच्यासह सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागणार की नाही, याची चर्चा आता खूप मोठ्या प्रमाणात रंगली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्यास कडक नियम लागू करावे लागतील, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यानंतर अगदीच शेवटचा पर्याय म्हणजे टाळेबंदी करावी लागेल, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. पण या सर्व टाळेबंदीच्या निर्णयाला भाजपचा मात्र कडाडून विरोध आहे.
योग्यवेळी टाळेबंदी केली नाही
टाळेबंदी केल्याने आपण खड्ड्यात गेलो, असे राज्यातील सत्ताधारी एकेकाळी म्हणत होते. मग आता पुन्हा टाळेबंदी कशासाठी करत आहात, सर्वसामान्य जनतेच्या पोटा-पाण्यावर परिणाम होणारा कोणताही निर्णय होणार असेल तर तो निर्णय भाजप कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळेस त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारला दिला. हे सरकार कोरोना नियंत्रण आणण्यात अपयशी ठरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा वाढत होता तेव्हा पहिल्या टप्प्यात योग्यवेळी टाळेबंदी केली असती तर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असता. मात्र, त्यावेळी टाळेबंदी योग्य पद्धतीने केली नाही, म्हणून कोरोना प्रादुर्भाव वाढला अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली. तसेच त्यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या टाळेबंदी संदर्भातल्या निर्णयाचे मी स्वागत करतो असं त्यांनी सांगितलं हे सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले याचे मुख्य कारण म्हणजे सरकारमधील अंतर्गत कलह आणि समन्वयाचा अभाव यामुळेच कोरोनाला रोखण्याच नियोजन कोलमडले आणि त्याची जबाबदारी सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, असे प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
हेही वाचा - रश्मी ठाकरेंच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मोदींचा उध्दव ठाकरेंना फोन