नाशिक - यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील सर्वच मंदिरे बंद असल्याने भाविकांचा हिरमोड झालाय. तर दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशासह राज्यभरातील भाविक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. यंदा दर्शन न होऊ शकल्यामुळे हिरमोड झालेल्या भाविकांसाठी सोमवारपासून त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने ऑनलाईन दर्शन सुरू करण्यात आले. यामुळे महादेव भक्तांना घरबसल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.
व्रतवैकल्यांचा महिना म्हणून श्रावण महिन्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याने लाखोंच्या संख्येने देशासह राज्यभरातील भाविक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देवस्थान बंद असल्याने श्रावण तिसरा सोमवार उजाडून देखील भक्तांना आपल्या आराध्याचे दर्शन घेता आले नाहीये. यामुळे आता त्र्यंबकेश्वर देवस्थानाने भाविकांना महादेवाचे दर्शन व्हावे यासाठी सोमवारपासून ऑनलाईन दर्शन सुरू केले आहे. सोमवारी दुपारी चार वाजे नंतर हे दर्शन सुरू करण्यात येणार असून यासाठी देवस्थान पदाधिकार्यांच्या वतीने अधिकृत लिंक देखील जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता भाविक घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने महादेवांचे दर्शन घेऊ शकणार आहेत
त्रंबक नगरीत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी त्रंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या भाविकांना मंदिर बंद असल्याने बाहेरूनच माघारी परतावे लागत असल्याची खंत व्यक्त केलीय. यामुळे लवकरात लवकर मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाविकांच्या वतीने करण्यात येत आहे
एकीकडे हर हर महादेव जय भोले अशा गजरात दर वर्षी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा फेरी निघत असते. मात्र, यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही फेरी रद्द करण्यात आली. यामुळे हिरमोड झालेल्या भाविकांना ऑनलाइन पद्धतीने का होईना त्रंबक राजाचे दर्शन मिळणार असल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.