नाशिक - दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यात कांद्याला मागणी वाढली आहे. परिणामी मागणी पेक्षा कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
हेही वाचा - परदेशातून कांद्याची आयात, शेतकरी-व्यापारी नाराज
नाशिक बाजार समितीत कांदा किमान 3800 ते 4400 रुपये क्विंटलने विकला जात आहे. गुरुवारी याच कांद्याला नाशिकच्या अभोना उप बाजार समितीमध्ये 5 हजार 111 रुपये क्विंटल दर मिळाला होता. मात्र, आज भाव काही प्रमाणात खाली आल्याचे दिसून आले. तसेच नाशिक जिल्ह्यात देखील 20 ते 25 टक्के कांदा शिल्लक असून शेतकऱ्यांकडे कांदा कमी प्रमाणात आहे. बाजार समितीत कांद्याचे दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी कांदा एकदम बाजार समितीत आणू नये, टप्याटप्याने कांदा आणावा, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - कांद्यासह लसणाच्या भावात तेजी; अतिवृष्टीमुळे उत्पादन प्रभावित
दक्षिण भारतात पाऊस सुरू झाल्याने तेथील लाल कांदा काढणीला विलंब होत असल्याने कांदा दरात तेजी आली आहे. दक्षिणेचा कांदा बाजारात 10 ते 15 दिवसांनी दाखल झाल्यानंतर हे दर कमी होतील तो पर्यंत पुढील 15 दिवस भाव असेच राहतील, असे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.