लासलगाव (नाशिक) - कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव (Lasalgaon Onion Market) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या भावात (Onion Market Price) गेल्या आठवड्याच्या तुलनेत 275 रुपयांची घसरण झाली आहे. तसेच पंधरा दिवसात एक हजार रुपयांनी कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. लाल कांद्याचे कमाल 852 रुपये, किमान 300 रुपये तर सर्वसाधारण 650 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कांदा आवक वाढल्याने कांदा भावात घसरण-
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या ठिकाणी तसेच लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची, लाल कांद्याच्या बरोबरीने आवक दाखल होत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भाववर झाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर गेल्या आठवड्यातील गुरुवारच्या तुलनेत आज सोमवारी लाल कांद्याच्या कमाल बाजारभावात 275 रुपयांची, तर 5 मार्चच्या तुलनेत 1 हजार रुपयांची मोठी घसरण झाली. त्यामुळे कांद्याचे बाजार भाव 900 रुपयांच्या आत आले. तसेच शेतकऱ्याला उत्पादन खर्च बाराशे ते पंधराशे रुपये आला असून, तो कांदा पाचशे रुपयांनी विकावा लागला आहे. त्यामुळे तोटा सहन करण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.