नाशिक - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिंडोरी तालुक्यात आज(गुरुवार) पुन्हा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे आंबे दिंडोरी गावाचा परिसर सील करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
माहितीनुसार आंबे दिंडोरी येथील ६० वर्षीय पुरुष नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार निमित्त गेला असता यावेळी त्याचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून सदर व्यक्ती हा पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे. या अहवालाची तत्काळ दखल घेत रुग्ण राहत असलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. तर, त्या लगतचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करीत सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
तसेच रुग्णाच्या संपर्कातील लोकांना कोव्हीड उपचार केंद्र येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच, विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी काळजी घ्यावी, अशी माहिती दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी सुजित कोशिरे यांनी दिली आहे. दिंडोरी तालुक्यात यापूर्वी आढळलेले ९ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर, जानोरी येथील रुग्णावर उपचार सुरू आहे. त्यात आज पुन्हा नवीन रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.