नाशिक - जिल्ह्यातील येवला तालुक्यातील खामगाव येथे खडी क्रशरवर देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. तुळशीराम मोतीराम सुराशे (वय ६०) अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्या करून चोरट्यांनी खडी क्रशरवरील डंपर चोरून नेला.
खामगाव येथील सुदाम कारभारी कदम यांच्या खडी क्रशरवरील महागड्या मशिनरी आणि खडी वाहतुकीसाठी २ डंपर याच्या देखरेखीसाठी खामगाव पाटी येथील तुळशीराम सुरासे यांची नियुक्ती केली होती. सकाळी चहा पिण्यासाठी घरी येत असलेले तुळशीराम उशिर झाला तरी आले नाही म्हणून कुटुंबीयांनी फोन केला. त्यांचा फोन लागत नसल्याने कुटुंबातील सदस्यानी सकाळी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना २ पैकी एक डंपर जागेवर नसल्याचे आढळून आले व दुसऱ्या डंपरच्या केबिनमध्ये तुळशीराम मोतीराम सुराशे यांचा मृतदेह आढळून आला. कुटुंबातील व्यक्तींनी या घटनेची माहिती येवला पोलिसाला दिली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तुळशीराम सुराशे यांचे हात-पाय बांधून डंपरच्या केबिनमध्ये हत्या केल्याचे दिसून आले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यावेळी कुटुंबातील व्यक्तींनी आणि गावातील ग्रामस्थांनी मोठा गदारोळ केला. आरोपींना त्वरित अटक व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.