नाशिक - कौन बनेगा करोडपती शोच्या नावाखाली नाशिकसह राज्यभरात अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्यास नाशिक सायबर पोलिसांनी कोल्हापुरातून अटक केली आहे. या आरोपीने अनेकांना गंडा घातल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
ऋषिकेश अभिजित मोरे (वय २२ वर्षे, मुळ रा. राम लक्ष्मी गल्ली, साळगाव, ता. आजरा, जि. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. ऋषिकेशचा ऑनलाईन प्रमोशन करण्याचा पुण्यात व्यवसाय होता. ऋषिकेश काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका महिलेला कौन बनेगा करोडपतीची तुम्हाला लॉटरी लागली आहे, असे सांगून पंचवीस लाख रुपयाची लॉटरी लागल्याचा अमिष दाखवले. त्या लॉटरीचे पैसे मिळण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, अशी थाप मारत १० दिवसांत २ लाख ८६ हजार रुपये उकळले होते. या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने नाशिक सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
फसवणूक झालेल्या महिलेच्या तक्रारीवरून नाशिक सायबर पोलिसांनी सापळा रचून ऋषिकेश याला कोल्हापूर येथून अटक केली आहे. ऋषिकेश हा मै कौन बनेगा करोडपती से बोल रहा हू, असे हिंदी भाषेत विविध फोन नंबर बदलून बोलत अनेकांना गंडा घालत होता. ऋषिकेशला पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाशिक सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे.