नाशिक - शहरात दिवाळीच्या गर्दीमुळे एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता डेंग्यूनेही डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यातील 29 दिवसांमध्ये डेंग्यूचे जवळपास 78 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नाशिक शहरात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा उद्रेक काहीसा कमी असला, तरी नोव्हेंबर महिन्यात अचानक डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे. यासाठी डेंग्यू निर्मुलनासाठी महापालिकेने जनजागृती मोहीम सुरू केली असून डेंग्यूच्या डासांची उत्पत्तिस्थाने शोधून काढतानाच डेंग्यू डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्यांवर प्रत्येकी दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असताना दिवाळीच्या बाजारपेठेतील गर्दीमुळे पुन्हा एकदा काही प्रमाणात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाशी दोन हात करताना आरोग्य विभाग मेटाकुटीस आला असताना आता डेंग्यूचा देखील उद्रेक वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे.
नाशिकमध्ये दरवर्षी डेंग्यूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यंदा पावसाळ्यात डेंग्यूने दिलासा दिला असला, तरी थंडीत मात्र डेंग्यू वाढत असल्याचे चित्र आहे. जुलैत 14, ऑगस्टमध्ये 28, सप्टेंबरमध्ये 39 तर ऑक्टोबरमध्ये 56 रुग्ण आढळले आहेत. कोरोनानामुळे प्रशासनाचे डेंग्यूकडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम नोव्हेंबर महिन्यात दिसून आला असून डेंग्यूबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 19 दिवसांमध्ये डेंग्यूचे 78 नवे रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या महापालिकेच्या रुग्णालयातील आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. दरम्यान, डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरात डेंग्यू जनजागरण मोहीम सुरू केली आहे. डेंग्यूची उत्पत्तिस्थाने शोधून ती नष्ट केली जात आहेत. घरोघरीदेखील तपासणी केली जात असून डेंग्यूच्या उत्पत्तीस कारणीभूत असलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
आतापर्यंत आढळले २८२ रुग्ण
कोरोनामुळे यंदा नागरिक साथीच्या आजारांबाबत दक्ष झाले आहेत. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती झाल्याने गतवर्षाच्या मानाने डेंग्यूचे प्रमाण काहीसे कमी असल्याचे चित्र आहे. गतवर्षीपेक्षा यंदा या आजाराची रुग्णसंख्या कमी असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. गतवर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूचे ११२४ बाधित आढळले होते. यंदा गेल्या ११ महिन्यांत २८२ जणांना या आजाराची बाधा झाली आहे.