नाशिक - शहरासह जिल्ह्यात निर्बंध लागू करूनही कोरोना संसर्ग आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. रविवारी (१५ मार्च ) पुन्हा एकदा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांनी हजाराचा आकडा पार केला. काल दिवसभरात १ हजार ३५६ कोरोनाबाधित आढळले. सर्वाधिक ९४२ रूग्ण नाशिक महानगरपालिका हद्दीत आढळले. तर, दिवसभरात दोन रूग्णांचा कोरोनाने बळी गेला
चार दिवसात तब्बल ५ हजार १५३ रूग्ण -
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसात तब्बल ५ हजार १५३ रूग्ण आढळले. कोरोना संसर्गाच्या तीव्रतेच्या बाबतीत देशात नाशिक सातव्या क्रमांकावर असून परिस्थिती गंभीर आहे. कोरोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी जिल्हाप्रशासनाने कठोर पावले उचलत निर्बंध जारी केले आहेत. शनिवारी व रविवारी बाजारपेठा बंद ठेवत लाॅकडाऊन पाळण्यात आला. तरी देखील परिस्थिती नियंत्रणात येत नसून सलग चौथ्या दिवशी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकड्याने हजाराचा टप्पा गाठला.
सर्वाधिक रुग्णसंख्या महानगरपालिका हद्दीत -
रविवारी १ हजार ३५६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले तर, ५२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. शनिवारी पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा दीड हजारापेक्षा जास्त होता. रविवारी त्यात काहीशी घट दिसली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या ही नाशिक महानगरपालिका हद्दीतील आहे. त्याखालोखाल नाशिक ग्रामीण व मालेगाव शहरात सर्वाधिक रूग्ण आढळले. रोज हजाराच्या संख्येत रूग्णवाढ होत असल्याने जिल्हाप्रशासनाची चिंता वाढली आहे.
रविवारी दिवसभरातील रुग्णसंख्या -
नाशिक मनपा - ९४२
नाशिक ग्रामीण - २६९
मालेगाव मनपा - १२६
जिल्हाबाह्य - १९