नाशिक - श्री संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे, अशी अढळ श्रद्धा मनात ठेवत आज संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधी मंदिरास पादुका ठेवलेल्या पालखीने प्रदक्षिणा मारण्यात आली. दरवर्षी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात त्र्यंबकेश्वरहून हजारो वारकरी पालखीसोबत पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. मात्र, यावर्षी पालखी पादुका 30 जूनला 20 वारकऱ्यांसह शिवशाही बसने पंढरपूरला जाणार आहेत.
यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सर्वच सण उत्सवावर गदा आली असून, दरवर्षी आजच्या दिवशी मोठ्या उत्साहात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराज यांची पादुका पालखी पंढरपूरला मार्गस्थ होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे हा पालखी सोहळा रद्द करण्यात आला असून, ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून अढळ श्रद्धा मनात ठेवत आज संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधी मंदिरास पादुका ठेवलेल्या पालखीने मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रदक्षिणा मारण्यात आली. यानंतर ही पालखी सभा मंडपात ठेवण्यात आली.
वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत अभंग म्हणत पादुका पूजन करत संत निवृत्तीनाथांचा व श्रीहरी पांडुरंगाचा गजर केला. आता पालखी पादुका सभामंडपात असून त्यांचे नित्यपूजन होणार आहे. तर, 30 जूनला शिवशाही बसने 20 वारकरी पादुका पालखी घेऊन जाणार आहे. यावेळी मंदिरातील पायी वारी दिंडीत वारीचे मानकरी सुरेश गोसावी, पंढरपूरचे मोहन महाराज बेलापूरकर, सिन्नर तालुक्याचे बालकृष्ण डावरे महाराज वारकरी व महामंडलेश्वर फरशिवाले महाराज, देवबाप्पा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पवन भुतडा, मंदिर विश्वास्त योगेश गोसावी, संजय धोंगडे, पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, रामभाऊ मुळाने, ललिता शिंदे, जिजाबाई लांडे तसेच संत निवृत्तीनाथ भजन मंडळ वारकरी हे सामील झाले होते.